Wednesday, November 11, 2009

अविस्मरणीय प्रभात फेरी

अविस्मरणीय प्रभात फेरी

प्रभात फेरी म्हटले कि स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य चळवळीसाठी निघालेली प्रभात फेरी असाच अर्थ अभिप्रेत आहे. पण Morning Walk ला प्रभात फेरी व्यतिरिक्त वेगळा शब्दच मला सुचला नाही.

आज पर्यंत कैक प्रभात फेऱ्या झाल्या. कधी ठाण्याला तलाव-पाळी वर, कोपरीला, दादोजीवर. NCC मध्ये असताना मरीन drive वर. पण आजची प्रभात फेरी सबसे अलग आणि निव्वळ अविस्मरणीय. म्हणून तातडीने हे खरडण्याचे कष्ट घेतोय.

रात्री पाऊस पडल्याने, सकाळी आमचे क्रिकेट रद्द झाले. मला निरोप, मी तयार झाल्यावर मिळाल्याने, मी बाहेर पडलो. माझ्या हॉटेलपासून अर्ध्या कि.मी. वर VNIT (विश्वेश्वारीया नॅशनल Institute of Technology) आहे. प्रणव मागे मला म्हणाला होता कि सकाळी कॅम्पस मध्ये प्रभात फेरी साठी बाहेरील लोकांना प्रवेश दिला जातो. त्यावेळी त्याच्याबरोबर मी कॅम्पस रात्री पहिला होता.

आज VNIT च्या प्रवेशद्वारातून आत गेलो आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्यासारखे जाणवले. पाऊस पडल्याने रस्ते स्वच्छ झाल्याने चकचकीत दिसत होते. VNIT मध्ये रस्ते प्रमाणबद्ध आणि सुबक आहेत. प्रत्येक वळणावर माहिती फलक आहेत. VNIT मध्ये एखाद्या जंगलाला लाजवेल अशी झाडी आहे. कित्येक प्रकारची वेगवेगळी झाडे अगदी प्रेमाने इथे जपली आहेत. मला वनस्पती शास्त्रामधील काहीही कळत नाही पण अशा निखळ, मनमोहक आणि प्रसन्न वृक्षांच्या व हिरवाईच्या संगतीने माझ्या चित्त-वृत्ती प्रफुल्लीत न होत्या तरच नवल. राकट-कणखर दगडालाही वर्षा ऋतूमध्ये हिरवाईचा मोह पडतो आणि तोही स्वत:च्या अंगावर एखादे छोटेसे रोपटे फुलवतो. मी तर संवेदनशील माणूस, या वातावरणाचा माझ्या वर व्हायचा तोच सुखद परीणाम झाला.

शांततेचा प्रत्यय ठायी-ठायी येत होता. पक्ष्यांची किलबिल, प्रभात फेरीसाठी आलेल्यांच्या पावलांचे आवाज आणि कोणी प्राणायाम करतेय त्याचा फुस्स - फुस्स, एवढाच काय तो शांतता भंग.

नाजूक बकुळ फुलांचा अक्षय गंध हृदयात साठवून मी बाहेर पडलो.

- राजन महाजन
(नागपूरहून - १२ नोव्हेंबर २००९, स. ८ वाजता)

ता.क. - उद्या परत प्रभात फेरीसाठी VNIT मध्ये जायचेय या विचारानेच मला गुदगुल्या होतायत.

2 comments: