Friday, November 27, 2009

व्यथा नावाची....

व्यथा नावाची....

माझे “राजेंद्रकुमार ” असे अवघड नाव ठेवण्याची काय बुद्धी झाली आईला कोणास ठाऊक ? बहुदा तिने तिच्या वडिलांकडून स्फूर्ती घेतली असणार. त्यांनी तिचे नाव ठेवले “भीमा ”. हे नाव नदीचे आहे, माझे नाव 'भीम' नाही 'भीमा' आहे असे सांगून, सांगून आई दमली असेल ….कधी चिडली पण असेल. तिचे दुख: मी समजू शकतो. तिच्या सुदैवाने लग्नात नाव बदलण्याची आयती संधी तिला चालून आली आणि ती झाली “शामला”.

लग्नात नाव बदलण्याची सोय मुलांना उपलब्ध असती तर मी नक्की माझे नाव 'राजेंद्रकुमार' चे 'राजन' केले असते. शप्पथ घेऊन सांगतो मला आज पर्यंत “राजेंद्रकुमार ” या नावाने कधीच कुणी हाक मारलेली नाही. मला 'राजन ' म्हणूनच सगळे संबोधतात. ज्या मातेने मला “राजेंद्रकुमार” हे नाव दिले, तिनेही मला या नावाने कधीही हाक मारलेली नाही. मला सर्वात जास्त सवय आहे 'राजन' या नावाची. त्या खालोखाल “महाजन ”. शाळेत / कॉलेज मध्ये मला सर्वजण 'महाजन' म्हणूनच ओळखत. शाळेत तर मधल्या नावानेच एक -दुसर्याला हाक मारायची पद्धत होती. त्यामुळे या काळात हि “राजेंद्रकुमार ” या नावाचा कोणीहि उपयोग केला नाही. या अनुल्लेखाचा परिणाम असा झाला कि शालेय जीवनात आपण ज्या बर्याच परीक्षा देतो, उदा. गणित , संस्कृत , हिंदीभाषा वगैरे, त्या सर्व प्रमाणपत्रांवर माझे नाव ' राजन महाजन ' आहे किंवा ' राजेंद्र महाजन ' आहे .

काहीजण मला “ राजेंद्र ” हाक मारतात विशेषत: ऑफिसमध्ये पण त्याने गोंधळ असा होतो कि माझ्या appointment letter, salary स्लीप, PF अशा कागदांवर माझे नाव चुकीचे छापले जाते आणि ते नित्य -नेमाने मला दुरुस्त करून घ्यावे लागते . सध्याच्या कंपनी मध्ये तर HR वाल्यांनी कमाल केली. प्रथम Appointment Letter वर नाव आले ‘राजन महाजन ’. मी विचारले कि हे कुठून घेतलेत ? तर उत्तर मिळाले कि तुमचा email ID आहे mahajan.rajan@..... . मनातल्या मनात म्हटले मी उद्या email ID, sexy_rajan@.... ठेवला तर काय छापाल Appointment Letter वर ?? मग मिळाले ते “राजेंद्र महाजन ” छापून , त्यानंतर “राजेंद्र कुमार महाजन ” (मला भैय्या करून टाकले ). सरते शेवटी माझ्या अथक प्रयात्नांनातर बरोबर नाव छापून Appointment Letter मिळाले आणि माझा जीव भांड्यात पडला.

माझे नाव जर वडिलांनी ठेवले असते तर कदाचित छान आणि गोंधळ-मुक्त असते. त्यांचे नाव आहे “मधुकर ”. मधु म्हणून पण कोणीही हाक मारली तरी नाव मधुकरच असणार हे सर्वज्ञात आहे. ते मधुचंद्र किंवा मधुमेह कोणत्याच angle ने होणार नाही. माझे तर भयंकर आहे……… 'राजन' वरून खरे नाव 'राजेंद्रकुमार' आहे हे ओळखणारा मला अजून सापडाय्चाय.

- राजेंद्रकुमार (राजन) महाजन

27 november 09

Wednesday, November 25, 2009

ड्रेस कोडं

ड्रेस कोडं


मुलींचा ड्रेस कोड हे मला पडलेलं एक कोडं आहे ?

समस्त स्त्री जातीची माफी मागून Sleeve less, low neck, back less असले कपडे मुलींना खूप आवडतात असे म्हणण्याचे धाडस मी करत आहे. कपडे हे अंग झाकण्यासाठी असतात यावरील विश्वास उडावा अशी वस्त्रे मुली परिधान करतात.

मुलांना सरधोपट कपडे, प्यांट आणि शर्ट किंवा अजून मौज म्हणजे हाफ प्यांट आणि T-शर्ट. या मुलांच्या ड्रेस कोडवर तर मुलींनी केव्हाच अतिक्रमण केलेय. पण मुलींच्या कपड्यांवर मुलांनी अतिक्रमण केल्याची उदाहरणे फार क्वचित, ते हि अशा व्यक्तिकडून कि जो संभ्रमात आहे कि तो मुलगा आहे कि मुलगी ?

संपूर्ण गळा उघडा टाकून चाललेला मुलगा मी फक्त fashion show मध्ये पाहिलाय. नुसतीच बनियन घालून फिरणारी मुले केव्हातरी दिसतात. बनियनचे वरचे straps आहेत पण दिसत नाहीत अशी किमया तर मी कधीच पाहिली नाहीये. पूर्ण पाठ दाखवत रस्त्यातून चाललेला मुलगा मला आज पर्यंत आढळलेला नाही. पण या सर्व गोष्टी मुली, त्यांना उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या कपड्यातून मोठ्या खुबीने करतात.

मुंबईमध्ये खूप उकाडा असतो, गरम होते हे मान्य. पण त्याचा मुलींनाच जास्त त्रास होतो हे मात्र मला पटत नाही.

एक fashion मात्र सध्या common आहे ती म्हणजे अंतर्वस्त्रे दिसतील अशा चतुराईने प्यांट घालणे. मला प्रश्न पडतो कि जर ती दिसावी अशी जर तुमची प्रामाणिक इच्छां आहे तर मग ती प्यांटच्या वर का घालत नाही ?

आता मुलींनी असे कपडे घातल्यावर, मुलांनी जर त्याकडे कौतुकाने नाही पाहिले तर त्यांचा घोर अपमान नाही का ? पण मुलींना ह्या भावना समजतच नाहीत….. त्यांच्या मते सर्वांनी डोळे बंद करायचे किंवा जास्त निरखून पाहायचे नाही. अरे, एखादा असतो जरा जास्त चिकित्सक.


तात्पर्य –

हम आह भरते है, तो हो जाते है बदनाम
वह कत्ल भी करते है, तो चर्चा नहीं होता


- राजन महाजन

२५ नोव्हेंबर २००९

Monday, November 16, 2009

किल्ला घ्यायचाय …..

किल्ला घ्यायचाय …..


३५० वर्षांपूर्वी जर चक्रम संस्था अस्तित्वात असती तर नक्कीच साऱ्या चक्रमानी महाराजांच्या हाताखाली खुशीने काम केले असते . एक गोष्ट महाराजांनाही जमली नसती ती म्हणजे त्यांचे स्वभाव बदलणे . स्वभावाला औषध नसते . या चक्रमांवर जर महाराजांनी किल्ला घेण्याची जबाबदारी टाकली असती तर काय घडले असते ह्याची ही छोटीशी काल्पनिक झलक .या कल्पनेत असे गृहीत धरले आहे कि ३५० वर्षांपूर्वी आजच्या सोयी उपलब्ध होत्या .

किंबहुना, आज महाराज असते तर .........असेही थोडेसे स्वरूप या लेखाला आहे .

महाराज – बऱ्याच दिवसांपासून हा रायगड मनात घर करून आहे, हा किल्ला आपल्याकडे हवा अशी इच्छा आहे.

बाळासाहेब (रवी परांजपे ) – बस, एवढेच ! मग आधी तरी सांगायचे. आणि एकच किल्ला, काय महाराज ? ठीक आहे. किती पैसे लागतील ते बोला, मी जमा करतो. लढायचे वगैरे बाकीचे लोक बघून घेतील. एकच विनंती की काम फत्ते झाल्यावर, भाषण मी करणार.

महाराज – किरण , आपला काय विचार आहे ?

किरण – तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, महाराज. करू ……काहीतरी करू आपण . महाराज …….किल्ला आत्ता लगेच घ्यायची इच्छा आहे का आपली ? नाही, ६ महिन्यानंतर नाही चालणार का ? ६ महिन्यानंतर आपल्या FD mature होतायत म्हणजे युद्द्धाच्या खर्चासाठी त्या FDs लगेच मोडायला नकोत. आणि अजून एक गोष्ट, आपले बाळासाहेबच दर वेळी पैसे जमा करण्यात पुढे असतात, किमान एकदा त्यांना ह्या जबाबदारीपासून दूर ठेवावे .

महाराज – ठीक आहे, विचार करू यावर. माधवजी तुमचे काय म्हणणे आहे ?

माधव (फडके), बाकीच्यांना उद्देशून – बोला ……कोण जबाबदारी घेतय ? कोणी तरी तरुण आणि नवीन माणसाने जबाबदारी घ्या. मी बऱ्याच वेळा किल्ले घेण्यामध्ये होतो, आता तुम्ही पण शिकायला पाहिजे. महाराज, तुम्ही चार दिवस आधी बोलला असतात तर मीच जबाबदारी घेतली असती पण आता पुढचे काही दिवस मी जाम busy आहे, शेतावर खूप काम आहे. तरीही, जो कोणी जबाबदारी घेईल त्याच्याकडे follow-up करायचे काम माझे. जर काही तलवारी वगैरे कमी पडत असतील तर मला सांगा, मी आश्विनभाईना फोन करून तलवारी किंवा निधीची सोय होईल का ते बघेन.

महाराज – विलासशेठ तुम्ही बोला, काही बोलायचे आहे का ? बऱ्याच वेळा हात वर केला होता तुम्ही.

विलास – नाही , तुम्ही म्हणताय ते योग्य आहे ……सगळेच जे म्हणाले ते बरोबर आहे . नाही... युद्धासाठी, पैसे जमा करण्यासाठी, तुम्ही म्हणाल त्या कामासाठी मी available आहे . युद्ध सामुग्रीचे काही काम असेल तर ते हि Equipment In-charge म्हणून मी करेन, तेवढा technical अनुभव आहे माझ्याकडे. एकच करा महाराज , आज कालची हि नवीन पोरे पण माझी टिंगल करतात, त्यांना एकदा चांगला दम द्या.

महाराज – शेठ , देतो मी दम.

महेश केंदुरकर – महाराज , मी बोलू का ? रायगड घ्यायचा असे काहीही आपले मागच्या AGM मध्ये ठरलेले नाही. युद्धासाठी आपण budget हि sanction करून घेतलेले नाही. जर हा असा खर्च करायचा असेल तर आधी general meeting घेऊन खर्चाला मान्यता घ्यावी लागेल. माझ्यामते ज्या नियमांना आणि घटनेला आपण सर्वांनी मान्यता दिली आहे तिच्या प्रमाणेच आपण वागावे . (मनातल्या मनात –जर असे केले नाहीत तर मी उद्या एक खरमरीत e-mail करेन आणि त्याची सर्वाना cc करीन.)

महाराज – तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे घटनाबाह्य आपण काहीही करणार नाही . (मनातल्या मनात – आणि जर केलेच तर तुम्ही मला E-mail या शस्त्राने नामोहरम कराल हे मला माहितीये ) शारंगराव , तुम्हाला काय वाटते ?

शारंग – (मनातल्या मनात – काय उद्योग नाही का दुसरा ?) मला विचारलेत म्हणून, स्पष्टच सांगतो कि आपल्याला ह्या किल्ल्याची सध्या काही गरज नाही . Already जे किल्ले घेऊन ठेवलेत ते आपण व्यवस्थित सांभाळूया , मग पुढे.

महाराज – ते तुमचे मत असेल, बहुमत नाही (आता महाराज पण थोडे चक्रमानप्रमाणे बोलू लागले ). आपण इतरांचे मत घेऊ . नितीनजी, तुमचे काय मत आहे ?

नितीन – (Laptop उघडून ) मी एक data sheet बनवली आहे . किल्ला घायचा असेल तर किती पैसे लागतील, किती सैन्य लागेल, किती युद्द्ध साहित्य लागेल, कुठल्या बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा, कोणत्या वेळी करावा इत्यादी सगळी माहिती मी जमा केली आहे. संपूर्ण logistics तयार आहे.

महाराज – बघू .

महाराज data sheet नजरेखालून घालतात आणि चिंताग्रस्त मुद्रेने म्हणतात – नितीनजी, तुम्ही ज्या किल्ल्याची माहिती गोळा केलीय, तो मागच्या वर्षीच आपण घेतला. तो किल्ला घेण्या अगोदर हि सर्व माहिती काढायचे आदेश तुम्हाला दिले होते. जाऊ दे , या वेळी वेळेत माहिती जमा करून आमच्याकडे पाठवा.

भाऊकडे पाहत - भाऊ, …..किल्ला घ्यायचाय आपल्याला .

भाऊ (गोगटे ) – तो तुमचा problem आहे. माझा आणि स्वराज्याचा काही संबंध नाही. तुमच तुम्ही काय ते बघून घ्या.

अनिकेत (पप्पू ) – महाराज, मी ! महाराज, मी ! ……. मला , मला संधी द्या एकदा.

महाराज – नको , please ….तुम्ही जबाबदाऱ्या घेता आणि नंतर तुम्हाला शोधायला माणसे धाडावी लागतात.

सुदीप , कार्यवाह , तुम्ही काहीतरी बोला ….

सुदीप – महाराज ……(महेशकडे हळूच एक नजर टाकत ) माझ्या हि डोक्यात exactly तुमच्यासारखाच विचार कित्येक दिवस चालू होता. मलाही हेच वाटत होते कि हा किल्ला आपल्याकडे हवा. फक्त तुम्ही बोललात आणि मी बोललो नाही. हा किल्ला घ्यावा असे माझेही मत आहे. पण महेश के म्हणाल्याप्रमाणे AGM मध्ये आपण काही ठरवले नसल्याने आपण तसे लगेच करू शकणार नाही. शारंगने म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे पण तपासायला हवे कि आपल्याला या किल्ल्याची तत्काळ गरज आहे का ? किरण ने सांगितल्या प्रमाणे ६ महिन्यानंतर चालत असेल तर तेव्हा विचार करू.

महाराज – हि सगळी मते आम्ही ऐकली आहेत, तुमचे मत काय आहे ?

सुदीप – माझे मत ? (डोके खाजवून ) सांगितले ना मी ?

तेवढ्यात MB धावत -पळत दरबारात आले.

महाराज – महेशराव, आज उशीर झाला यायला ?

MB – महाराज , काही केल्या घरामध्ये तलवारच सापडत नव्हती . मग म्हटले, मरू देत. दुसरी तलवार विकत घेतली आणि आलो. मला कळले तुमची काय चर्चा चालू आहे ते, सुदीपचा sms आला. माझ्या मते आपण प्रतापगड घ्यायलाच हवा , मग काय वाट्टेल ते झाले तरी चालेल .

महाराज (कपाळावर हात मारून ) – महेशराव, प्रतापगड आपलाच आहे ……..चर्चा रायगडबद्दल चालू आहे. मागच्या वेळी हि तुम्ही जो किल्ला घ्यायला निघालात तिथे जाण्याऐवजी भलत्याच किल्ल्या जवळ जाऊन सैन्याची वाट पाहत बसलात. सैन्य एका किल्ल्याजवळ आणि तुम्ही दुसऱ्या किल्ल्याजवळ असे दोन दिवस गेले आणि एकमेकाची वाट पाहत दोघांना परतावे लागले.

MB – महाराज, कधीतरी अशी चूक होते. माफी मागतो.

महाराज – विनयजी, तुम्ही गप्प आहात बराचवेळ, बोला तुमच्या मनात काय आहे ?

विनय – (चेहऱ्यावरील भाव , दाढीमागे लपवत ) मी आशुशी बोलतो. माझी कशालाच काही हरकत नाही.

महाराज – OK. राजन, तुमचे काय मत ?

राजन – प्रथम , मला online account ओपन करून द्या …..मी कधी पासून सांगतोय कि आपल्या लोकांना जाम त्रास होतोय पैशाच्या उलाढाली करायला, तर माझे कोणी ऐकतच नाही. प्रत्येक वेळी मी हा मुद्दा उपस्थित करतो आणि त्या मुद्द्यावर काहीच ठोस कारवाई होत नाही. आता technology किती पुढे गेलीये आणि आपण अजून ढाल -तलवारी घेऊनच लढतोय…. आधी २५ बंदुकांची provision करा.

महाराज हताश होतात.

बर्वे आणि बापुमामा बोलण्याची परवानगी मागतात. महाराज परवानगी देतात.

बापुमामा – मी जे बोलणार आहे ते आमच्या दोघांच्या वतीने. आम्ही खूप वेळा सांगूनही गेल्या २ मोहिमांचे अहवाल आणि मोहिमांचा जमा -खर्च अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळे आम्ही तो आपल्यासमोर सादर करू शकलेलो नाही . तरी यासंबंधी योग्य ती कारवाई लगेच करावी.

महाराज – सर्वांची मते ऐकून , मीच confuse झालोय . माझे काय मत होते , याचाच मला विसर पडलाय . आपण एक काम करूया, हि सभा तहकूब करून पुढील सभेमध्ये परत याच विषयावर चर्चा करून, योग्य तो निर्णय घेऊया.

अशा रितीने, सभा तहकूब होते.

- राजन महाजन

१६ नोव्हेंबर २००९

टीप - येथे कोणासही दुखावण्याचा हेतू नसून व्यक्तिरेखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला सांगण्यास आनंद आहे कि चक्रममध्ये अशा भिन्न विचारांच्या आणि मतांच्या व्यक्ती असून देखील, गेली २६ वर्षे संस्था कार्यरत आहे. संस्थेचा विस्तार होण्यामागे या भिन्न प्रकृतीच्या लोकांची एकत्र येऊन, एका ध्येयासाठी काम करण्याची वृत्तीच कारणीभूत आहे, हे नि:संशय. " यहाँ मतभेद है, मनभेद नहीं "

हि कल्पना पूर्णपणे माझी नाही . आशु आणि मला हि कल्पना मार्च महिन्यामध्ये रतनगडावर नेढ्यामध्ये बसलो असता सुचली.

Wednesday, November 11, 2009

अविस्मरणीय प्रभात फेरी

अविस्मरणीय प्रभात फेरी

प्रभात फेरी म्हटले कि स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य चळवळीसाठी निघालेली प्रभात फेरी असाच अर्थ अभिप्रेत आहे. पण Morning Walk ला प्रभात फेरी व्यतिरिक्त वेगळा शब्दच मला सुचला नाही.

आज पर्यंत कैक प्रभात फेऱ्या झाल्या. कधी ठाण्याला तलाव-पाळी वर, कोपरीला, दादोजीवर. NCC मध्ये असताना मरीन drive वर. पण आजची प्रभात फेरी सबसे अलग आणि निव्वळ अविस्मरणीय. म्हणून तातडीने हे खरडण्याचे कष्ट घेतोय.

रात्री पाऊस पडल्याने, सकाळी आमचे क्रिकेट रद्द झाले. मला निरोप, मी तयार झाल्यावर मिळाल्याने, मी बाहेर पडलो. माझ्या हॉटेलपासून अर्ध्या कि.मी. वर VNIT (विश्वेश्वारीया नॅशनल Institute of Technology) आहे. प्रणव मागे मला म्हणाला होता कि सकाळी कॅम्पस मध्ये प्रभात फेरी साठी बाहेरील लोकांना प्रवेश दिला जातो. त्यावेळी त्याच्याबरोबर मी कॅम्पस रात्री पहिला होता.

आज VNIT च्या प्रवेशद्वारातून आत गेलो आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्यासारखे जाणवले. पाऊस पडल्याने रस्ते स्वच्छ झाल्याने चकचकीत दिसत होते. VNIT मध्ये रस्ते प्रमाणबद्ध आणि सुबक आहेत. प्रत्येक वळणावर माहिती फलक आहेत. VNIT मध्ये एखाद्या जंगलाला लाजवेल अशी झाडी आहे. कित्येक प्रकारची वेगवेगळी झाडे अगदी प्रेमाने इथे जपली आहेत. मला वनस्पती शास्त्रामधील काहीही कळत नाही पण अशा निखळ, मनमोहक आणि प्रसन्न वृक्षांच्या व हिरवाईच्या संगतीने माझ्या चित्त-वृत्ती प्रफुल्लीत न होत्या तरच नवल. राकट-कणखर दगडालाही वर्षा ऋतूमध्ये हिरवाईचा मोह पडतो आणि तोही स्वत:च्या अंगावर एखादे छोटेसे रोपटे फुलवतो. मी तर संवेदनशील माणूस, या वातावरणाचा माझ्या वर व्हायचा तोच सुखद परीणाम झाला.

शांततेचा प्रत्यय ठायी-ठायी येत होता. पक्ष्यांची किलबिल, प्रभात फेरीसाठी आलेल्यांच्या पावलांचे आवाज आणि कोणी प्राणायाम करतेय त्याचा फुस्स - फुस्स, एवढाच काय तो शांतता भंग.

नाजूक बकुळ फुलांचा अक्षय गंध हृदयात साठवून मी बाहेर पडलो.

- राजन महाजन
(नागपूरहून - १२ नोव्हेंबर २००९, स. ८ वाजता)

ता.क. - उद्या परत प्रभात फेरीसाठी VNIT मध्ये जायचेय या विचारानेच मला गुदगुल्या होतायत.

Wednesday, November 4, 2009

पाणी वाचवा ! पण कोणी ?

पाणी वाचवा ! पण कोणी ?

नागपूर, सुरत किंवा नाशिक कुठल्याही गेस्ट हाउस किंवा हॉटेल मधला माझा अनुभव असा आहे कि नळाला गरम पाणी येत नाही असे reception ला सांगितले कि दोन बादल्या जाऊ देत मग गरमा-गरम पाणी येईल असे सांगितले जाते. दोन बादल्या जाऊ देत म्हणजे काय ? आणि किती वेळा ?

शताब्दी / राजधानी अशा तत्सम ट्रेन्स मध्ये १ लिटर पाणी प्रवाश्यांना फुकट दिले जाते. कमी अंतर प्रवास करणारे बरेचसे प्रवासी अर्धी बाटली पाणी वापरतात आणि उरलेली तशीच ठेऊन जातात. मी attendant ला या सोडून गेलेल्या बाटल्यान्बद्दल विचारले तर या सगळ्या बाटल्या कचऱ्यात जातात असे मला कळले. मुंबई - सुरत शताब्दी रोज २ वेळा धावते, राजधानी हि २ वेळा, भारत भर अशा किमान ५० कमी अंतराच्या गाड्या धावतात आणि त्यातून अंदाजे २००० प्रवासी प्रवास करतात असे मानले आणि प्रत्येकी अर्धा लिटर पाणी वाया जाते असे धरले तर वर्षाकाठी साधारण १ कोटी ऐंशी लाख लिटर पाणी वाया जाते. माझ्याकडे गाड्यांचे आणि प्रवाश्यांचे खरे आकडे नाहीत, ते पहिले तर माझी खात्री आहे कि हा आकडा किमान ५ कोटी लिटर च्या वर जाईल. जे मला कळू शकते ते रेल्वेमधील अधिकार्यांना कसे कळत नाही. १ लिटर च्या ऐवजी अर्धा लिटरच्या बाटल्या वापरल्या तर कित्येक लिटर पाणी वाचू शकते हे त्यांना कसे कळत नाही.

Toilet मध्ये flush च्या वापरण्याने flush च्या आकाराप्रमाणे ५/८ लिटर पाणी वापरले जाते. एवढ्या पाण्याची खरच गरज आहे का ? मी माझ्या घरात गेली ४ वर्षे flush वापरलेला नाही. साधारण २/३ लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित काम होते. एक घरटी सरासरी ४ माणसे आणि दिवसाला flush ४ वेळा वापरतात असे गृहीत धरू. flush न वापरल्यास दिवसाला किमान १० लिटर पाणी वाचेल आणि वर्षाला ३६५० लिटर. एका सोसायटी मध्ये १५ कुटुंबे असतील तर ती वर्षाकाठी ५४७५० लिटर पाणी वाचते. विचार करा फ़क़्त flush न वापरल्याने मुंबई / ठाण्यामध्ये केवढी पाण्याची बचत होऊ शकते.

माझ्या एका नातेवाईकाकडे मी गेले १ वर्षाहून जास्त काळ पाहतोय कि त्यांचा नळ खराब आहे आणि त्यांनी तो अजूनही दुरुस्त करण्याची तसदी घेतलेली नाही. अमाप पाणी त्यांच्याकडे वाया जाते बहुधा या पाणी गळतीमुळे त्यांच्या सोसायटीची टाकी कधीच पूर्ण भरत नसेल याची मला खात्री आहे. पण ते बुजुर्ग आणि ज्ञानी असल्याने त्यांना मी सांगितले तर ते नक्कीच माझे म्हणणे हसण्यावारी नेतील. अशा वेळी स्थानिक सरकारी खात्याने घरोघरी जाऊन धाडी घालून जिथे पाणी गळती आहे तिथे लोकांना पकडून तातडीने दंड केला पाहिजे. हवे तर आधी ३/४ महिन्याचा कालावधी लोकांना स्वत:हून पाणी गळती थांबविण्याची संधी द्या पण नंतर ढुंगणावर फटके दिले पाहिजेत. आपण लोकशाहीस नालायक आहोत, जो पर्यंत ढुंगणावर वळ उठत नाहीत तो पर्यंत आपण कोणाला जुमानत नाही.स्वयंशिस्त हा प्रकारच अस्तित्वात नाही.

पाण्यावाचून लोक बेघर होत आहेत, आत्महत्या करत आहेत, आपल्याला काय अधिकार आहे पाण्याची अशी नासाडी करायचा ? पाण्याचे बिल भरण्याची क्षमता, आपल्याला त्याचा हवा तसा दुरुपयोग करण्याचा अधिकार नक्कीच देत नाही असे माझे ठाम मत आहे. या पाण्याच्या गैरवापरावर कोणाचेच लक्ष नाही कि सरकारचा अंकुश नाही.

माझ्या अनुभवावरून मला वाटते कि १२ महिने पाऊस पडला तरी आपल्याकडे पाण्याची कपात करावी लागेल. आपण वेळीच जागे झालो नाही तर भविष्य भीषण आहे.

- राजन महाजन