Tuesday, March 23, 2010

मराठी अभिमानगीत


मराठी अभिमानगीत प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. किमान ५ ते ७ हजार लोक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू होता – मंचावर १५० जण आणि उपस्थित प्रेक्षक असे सर्वजण एकत्र गात होते – “लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी”

खरोखर अविस्मरणीय “ऐतिहासिक” सोहळा !!!

एका नेटमित्र श्री. संजय भिडे यांजकडून मेलद्वारे आलेले खालील पत्र, हे गीत प्रकाशित करण्यामागील उद्देशाबाबत अजून माहिती सांगते.



या गाण्याचा video पाहायचा असेल तर हि लिंक पहा. http://musicandnoise.blogspot.com/2010/03/marathi-abhiman-geet-video.html

हे गाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यामागील श्री. कौशल इनामदार यांचा हेतू जाणून घ्यायचा असेल तर हि लिंक पहा.

http://musicandnoise.blogspot.com/2009/03/in-2005-i-composed-and-performed-prayer.html

या चळवळीमध्ये सहभाग म्हणून मी एक सीडी स्वत:साठी घेतली (सीडी मध्ये video नाही याची नोंद घ्यावी) आणि आणखी २ सीडी भेट म्हणून दोन मित्रांना दिल्या.

- राजन महाजन

Monday, March 15, 2010

एक्लम खाजा

एक्लम खाजा,
धोबी राजा,
तिराण बोके,
चार चकोटे,
पंचल पांडव,
सैंया दांडव,
सत्तक टोले,
अश्टक नैले,
नवे नवे किल्ले,
दंसी गुलामा,
अक्कल खराटा,
बाल मराठा. 

माझ्या वयाच्या सर्वाना उक्त पंक्तींचा चटकन संदर्भ लागला असेल. गोटे (गोटया नाहीत) घेऊन खेळण्याचा हा खेळ दिवस-दिवस चालत असे. ज्याच्यावर पिदी यायची तो खपायचा. दोन-दोन दिवस पिदी चालायची. असाच दुसरा टीम पाडून खेळायचा खेळ म्हणजे राजा – राणी. पण एक्लम खाजाची सर त्याला नव्हती.

TV चा उदय तेव्हा झालेला होता. पण सुदैवाने गजरा, छायागीत, करमचंद, नुक्कड, किलबिल असे काही मोजकेच कार्यक्रम, तेही ठराविक वेळेत (संध्याकाळी एक - दोन तास) दाखवले जायचे. त्यामुळे करमणुकीसाठी खेळाशिवाय पर्याय नव्हता. हक्काचे अंगण होते. Society मध्ये चोहीकडे गाड्या park केलेल्या नसायच्या. झाडायला सोपे पडते म्हणून सर्वत्र concreteची जमीन नव्हती. आता मुलांनी गोटया खेळायचे म्हटले तरी गल करायला जमीनच नाही.

विविध प्रकारचे खेळ आठवतात ज्याची नावेही सध्या ऐकू येत नाहीत. विषामृत, डब्बा ऐसपैस, कुरघोडी, पायावर-पाय, लगोरी, विटी-दांडू. काय झाले या खेळांचे माहित नाही. सध्या मुलांना TV वरचे खेळ पाहून (Takeshi Castle, unbeatable banzuke, WWF) स्वत: न खेळताच आनंद मिळतो. ते चांगले कि वाईट या वादात मला नाही शिरायचे. पण आमचे बालपण जरा हटके होते, हे नक्की.

- राजन महाजन
१५ मार्च २०१०