Monday, July 12, 2010

हरा नाहीतर मरा


हरा नाहीतर मरा

फुटबॉल विश्वचषक संपला. जेतेपद स्पेनने पटकावले. सर्व संघ जिंकायचेच या इर्शेने खेळत होते. त्याच इर्शेने सर्व वाहिन्या खेळाच्या बातम्या सातत्याने दाखवत होत्या. या बातम्यांमधील एक बातमी ठळकपणे माझ्या लक्षात राहिली. कारण कोणताही संघ जेव्हा खेळतो (कोणताही खेळ) तेव्हा त्यामागचा उद्देश असतो जिंकणे, येनकेन प्रकारेण. फक्त सिनेमामध्ये या खेळाचा उद्देश वेगळा असु शकतो. उदा. लगानमध्ये क्रिकेटचा सामना जिंकल्यावर शेतसारा माफ होतो. ही बातमी पाहण्याच्या आधी जर मला कोणी सांगितले असते की जिंकण्याचा उद्देश हा आपल्या प्राणाची तमा न बाळगता, जिंकल्यावर आपला मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही, राष्ट्रप्रेमाखातर जिंकणे आणि प्राणाची आहुती देणे, हा असु शकतो, तर माझा विश्वास कदापि बसला नसता. पण अशी घटना घडलेली आहे, १९४२ साली.

युक्रेनमध्ये फुटबॉल हा खेळ प्रसिद्धीस येत होता. त्यांचा Dynamo Kiev हा संघ अत्यंत बलवान मानला जाई, या संघाने राज्य पातळीवर चांगला खेळ केला होता. १९४१ मध्ये नाझी सैन्याने त्यावेळच्या युक्रेनवर हल्ला केला. युद्धाच्या धामधुमीत संघाची वाताहत झाली, खेळाडू सैनिक म्हणून युद्धात सहभागी झाले. Kiev शहरावर नाझी सैन्याने कब्जा मिळवला आणि काही खेळाडू युद्धकैदी झाले.

Dynamo Kiev चा गोल कीपर, Nikolai Trusevich,

नाझिनी ताबा घेतलेल्या Kiev मधे एका बेकरीमध्ये कामाला लागला. बेकरी मालक फुटबॉल फॅन होता. त्याच्या पुढाकाराने, त्याने इतर खेळाडूंची जमवाजमव करून, FC Start हा संघ चालू केला. त्यात ८ खेळाडू Dynamo Kiev चे होते. ह्या संघाचा सामना, सैन्यातील वेगवेगळ्या देशांच्या संघांशी झाला. त्यानी हंगेरीचा संघ, रोमानियाचा संघ, जर्मनी चा संघ अशा एकंदरीत सात संघांचा पराभव केला तेही योग्य साहित्य, आहार आणि परिस्थिती नसताना. युद्धात पराभूत झालेल्या Kiev मधील संघ, विजयी सैन्याला फुटबॉल मधे हरवू लागला. यामुळे खेळात पराभूत होणार्‍या सैन्याचे मनोबल खच्ची होऊ नये आणि युद्धात पराभूत Kiev नागरिकांचे मनोबल उंचावू नये म्हणून नाझी सैन्याने FC Start संघाचा सामना जर्मनीचा बलाढ्य संघ Flakelf शी आयोजित केला.

मुख्य सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यामध्ये FC Start ने Flakelf संघाचा ५ – १ ने पराभव केला. मुख्य सामन्याची तारीख ठरली ९ ऑगस्ट १९४२. नाझी सैन्यातील अधिकार्‍याची रेफ्री म्हणून नेमणूक झाली जेणेकरून Flakelf संघाचा जिंकण्याचा मार्ग सुकर व्हावा. सामन्या दरम्यान FC Start खेळाडूना धमकी देण्यात आली की जर तुम्ही सामना जिंकलात तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि हरणेच तुमच्या फायद्याचे आहे.

Flakelf संघाने सुरुवाती पासून FC Start संघाच्या खेळाडूंवर ह्ल्ला सुरू केला. बॉल पेक्षा जास्त ते खेळाडूना लाथा मारू लागले, त्याना पाडू लागले. पण त्यांच्या सर्वा फौल्सकडे रेफ्रीने दुर्लक्ष केले. FC Start च्या गोलकीपरच्या ,Nikolai Trusevich, डोक्यात दोन वेळा लाथा मारण्यात आल्या पण रेफ्रीने त्याकडे लक्ष दिले नाही. FC Start ने Flakelf संघाच्या हिंसक खेळा विरुद्ध वेळोवेळी अपील केले पण रेफ्री ने त्यांचे काहीही ऐकायचे नाही असे ठाम ठरवले होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, दहशतीला/ हिंसेला न घाबरता, जीवाची पर्वा न करता, FC Startच्या खेळाडूनी आपला लाजवाब नैसर्गिक खेळ केला आणि Flakelf ला ५ – ३ ने हरवले. त्या ९० मिनिटांमध्ये त्या खेळाडूंची मानसिक स्थिती काय असेल याची नुसती कल्पना केली तरी माझ्या अंगावर काटा उठतो.

सामन्यानंतर काही दिवसांनी FC Start च्या सर्वा खेळाडूना एकेक करून काही ना काही कारणानी अटक करून त्यांची रवानगी नाझी छ्ळ छावणीमध्ये करण्यात आली. संघाचा कॅप्टन Nikolai Trusevich,Kuzmenko, Klimenko याना गोळी घालण्यात आली. Nikolai Korotkykh आणि २/३ जणांचा छ्ळ छावणीमध्ये झालेला अमानुष छ्ळ सहन न झाल्याने मृत्यू झला. या संघामाधील मोजकेचजण या छ्ळछावणीमधून युद्धानंतर सुटले. नक्की कोण आणि किती मेले या बाबत नेटवर वेगवेगळी माहिती आहे.

या खेळाडूंच्या स्मरणार्थ हा मृत्यूचा सामना ज्या झेनीट स्टेडियममधे खेळला गेला तिथे एक स्मारक उभारण्यात आले. युक्रेन मध्ये आजही या शूर खेळाडूंची वीरगाथा गायली जाते. Dynamo Kiev या संघातील खेळाडूचे लग्न झाले की पत्निसहित या स्माराकाशी आदरांजली वाहण्याची प्रथा इथे पाळली जाते.

अधिक माहितीसाठी ही लिंक पहा http://www.berdichev.org/the_death_match.html

-राजन महाजन
१२ जुलै २०१०

2 comments:

  1. ekdam jabardast article...hee berdichevchi site tula sapadli tari kuthe? ani ekdam yogya vel...lot of thnx for sharing this one

    ReplyDelete
  2. amazing information sir, really eye opening history.

    ReplyDelete