Friday, May 21, 2010

उखाणे


एका लग्नाला हजेरी लावली . वधू -वराची पंगत बसली . प्रथेप्रमाणे नाव घेण्याचा आग्रह झाला आणि प्रथेप्रमाणेच आढेवेढे घेऊन नाव घेत , घास भरवण्यात आला . एकीकडून नाव घेतले गेले –
रुसलेल्या राधेला , चंद्र म्हणतो हास
_____ ला भरवते , आमरस पुरीचा घास.
प्रतीपक्षाने नाव घेतले –
कुबेराच्या खजिन्यात सोन्याची रास
______ ला भरवतो, आमरस पुरीचा घास
प्रत्येक लग्नातील उखाणे साधारण ऐकलेले असतात . काही नाविन्य , सृजनशीलता (मराठीत Creativity) वगैरे बिलकुल नाही . लग्नामधील बर्याच गोष्टी बदलल्या . उदा. पंगत जाऊन बुफे सुरु झाला, आहेर जाऊन "Presents in Blessings only" झाले , विधिवत लग्न नसून झटपट विधी आले , AC hall आता common आहेत . पण उखाण्यात प्रकर्षाने जाणवेल असा काही बदल झालेला नाही.
उखाणे साहित्यामध्ये बदल घडवून आणण्याची निकड प्रकर्षाने जाणवतेय. या बदलामध्ये मी माझे खारीचे योगदान देतोय आणि काही वास्तवाच्या /सत्याच्या जवळ जाणारे , "जे मनी आहे तेच ओठी असावे" ह्या नियमावर आधारित उखाणे प्रस्तुत करत आहे.

बर्याच वर्षांच्या खटपटीनंतर , बोहल्यावर चढली आमची स्वारी,
पण घाई नाही झाली ना ? कारण बायकोपेक्षा मेव्हणीच दिसते भारी.
------------------xxx------------------
नाव घे , नाव घे म्हणून नका देऊ त्रास,
______ रावांच्या गोल प्रकृतीला झेपेल का ? श्रीखंड पुरीचा घास.
------------------xxx------------------
उन्हाळ्यात लग्न, म्हणून बाबांनी केला hall AC
एकाच प्रार्थना देवाशी , हे राहोत एकनिष्ठ माझ्याशी
------------------xxx------------------
मीना , माला , मंजिरी …. कोणीच पटवता नाही आली ,
वेळेत लग्न व्हावे म्हणून मंदाच्या गळ्यात माळ घातली.
------------------xxx------------------
कंटाळा आला या समारंभाचा,
हनीमूनचा लागलाय ध्यास,
सर्वाना लवकर उरकण्याचा आग्रह करून ,
______ ला भरवतो जिलेबीचा घास.

वरील उखाणे एकदम अस्सल (मराठीत original) आहेत , ते जसेच्या तसे वापरण्यास माझी काहीही हरकत नाही. पण वापरल्यावर होणार्या परिणामास मला जबाबदार धरता येणार नाही.
- राजन महाजन
२१ मे २०१०

3 comments:

  1. Mr. Rajan Mahajan,

    Lost your e-mail ID. We moved to a different server and my contact list is not yet imported.
    Facing some problem.
    Hence, request you to send me a test mail on my office e-ID.

    Thanks and warm regards.

    ReplyDelete
  2. hahaha, jabardasta ahe ha blog post! Nice.

    ReplyDelete